रत्नागिरी- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणीक नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यातच रत्नागिरीमध्ये आणखी एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 2 दिवसांपूर्वी साखरतर या गावातील जी महिला कोरोनाबाधित आढळून आली होती, त्याच महिलेच्या जावेला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित महिला 49 वर्षाची आहे. तिच्यावर रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा- मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, लॉकडाउन अधिक कडक करणार - राजेश टोपे
दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित आलेल्या महिलेच्या घरातील 14 जणांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, साखरतर या गावातील महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावचा परिसर 3 किमीपर्यंत सील करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला सर्व कोरोनाबाधितांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहिल्या कोरोना बाधित रुग्णाला डिस्चार्ज दिल्याची बातमी आनंदाची होती. त्यातच आता आणखी एक कोरोना बाधित आढळून आल्याने चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान, या साऱ्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत असून बाहेरुन आलेल्या नागरिकांनी स्वताहून उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाने केले आहे.