रत्नागिरी - स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचे निर्माते छत्रपती संभाजीराजे यांना कोकणात फितुरीमुळे पकडण्यात आल्याची सल आजही कोकणवासीयांच्या मनात कायम आहे, ती दूर करण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे नाव द्यावे, अशी मागणी भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.
भाजप नेते व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे माजी खासदार निलेश राणे यांनी याबाबत एक ट्विट केले असून छत्रपती संभाजीराजे यांना कोकणात पकडले गेले. कोकणच्या मनातील ही सल दूर करण्यासाठी आणि त्यांना आदरांजलीसाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे नामकरण व्हावे, असे त्यात नमूद आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने संगमेश्वर येथील कसबा येथे पकडून औरंगाबादला नेले होते. त्यांना पकडताना फितुरी झाल्याचा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराज या शूरवीरास फितुरीमुळे पकडले जावे, ही सल आज कोकणवासीयांच्या मनात आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाला छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे नाव दिल्यास संभाजी महाराजांना खरी आदरांजली ठरेल, असेही निलेश राणे यांनी नमूद केले आहे.