रत्नागिरी - जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. बावनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटाच्या पायथ्याला असलेला बावनदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
आज सकाळी बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली. बावनदीची इशारा पातळी 9.40 मीटर आहे, तर धोका पातळी 11 मीटर आहे. सकाळी 9 वाजता पाणी पातळी 11.30 मीटर होती. त्यामुळे बावनदी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावी येत आहेत. त्यात या मुसळधार पावसामुळे काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, बावनदीवरील वाहतूक थांबविण्यात आल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.