रत्नागिरी : बारसू-सोलगाव येथील जागा निश्चित झाल्यानंतर सोमवारपासून तेथे माती परिक्षण सुरु झाले आहे. अशा स्थितीत स्थानिकांनी प्रकल्पाला जोरदार विरोध सुरु केला आहे. स्थानिक ग्रामस्थ व पोलीस यांच्यात संघर्ष सुरु आहे. दरम्यान बुधवारी खासदार विनायक राऊत यांनी स्थानिकांची भेट घेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पाठिशी आहेत. वेळ पडली तर मुंबईतील शिवसेना आपल्या साथीला आणू, अशी ग्वाही दिली होती. तर दुसरीकडे प्रशासनाकडून गुरुवारी या प्रकल्पाबाबत चर्चेचे आयोजन देखील करण्यात आले होते.
आंदोलकाच्या भेटीला जाणार : दरम्यान आजच्या मोर्चाबाबत खासदार विनायक राऊत म्हणाले की, माझा मतदार संघ, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला धाऊन जाणार आहे. पोलीस अधीक्षकांना पूर्वसूचना देऊन मी आंदोलकाच्या भेटीला जाणार, असे खासदार विनायक राऊत यांनी यावेळी सांगितले. दरम्यान गुरूवारी झालेल्या बैठकीत मीडियाच्या लोकांना परवानगी नव्हती, ऑफ कॅमेरा बोलणी का झाली? असा सवालही खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात रिफायनरीबाबत असलेले मतांतरे, भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, असे देखील खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.
अशोक वालम यांना ताब्यात घेतले : रिफायनरी प्रकल्प विरोधी समितीचे नेते अशोक वालम यांना गुरुवारी रात्री रत्नागिरीच्या शहर पोलिसांनी राजापूर येथून ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री त्यांना रत्नागिरीत आणण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. आतापर्यंत रिफायनरी विरोधी समितीच्या तीन प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील दोघांची सुटका झाली आहे. बारसू - सोलगाव रिफायनरीसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जागेचे सर्वेक्षण सुरू आहे.
सर्वेक्षणाचे काम रोखण्याचा प्रयत्न : पंचकोशीतील स्थानिक ग्रामस्थांनी रिफायनरीला तीव्र विरोध करत भू सर्वेक्षणाचे काम रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी 110 ग्रामस्थांना अटक केली होती. सध्या त्यांची न्यायालयाने जामिनीवर सुटका केली आहे. रिफायनरी विरोधी गटातील नेत्यांना पोलिसांनी लक्ष केले आहे. सर्वेक्षणाला होणारा विरोध मोडीत करण्यासाठी पोलिसांनी आता नेत्यांची धरपकड सुरू केली आहे.