रत्नागिरी - राज्य सरकारच्या कुठल्याही गृह योजनेतून आता तुम्हाला एकच घर घेता येणार आहे. कारण घरांची मागणी जास्त आणि उपलब्ध घरे कमी असतात. त्यामुळे राज्य सरकारने घरांची मागणी पूर्ण होण्यासाठी व सर्वांना घरे मिळण्यासाठी सरकारी गृहनिर्माण धोरणात बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
आपलं हक्काचं घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या गृहनिर्माण योजनेतून एका व्यक्तीला केवळ एकच घर घेता येणार आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. यापुर्वी म्हाडामध्ये घर घेतलेल्या व्यक्तीला सिडकोतूनसुद्धा घर मिळत होते. मात्र आता या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीनंतर तसे होणार नाही. अगदी पंतप्रधान आवास योजनेतून घर घेतले असेल तरी त्याला राज्याच्या इतर कुठल्याही गृहनिर्माण योजनेतून घर मिळू शकणार नाही.
यासंदर्भातील नव्या धोरणाच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर सरकारी योजनेतून आता एकदाच घर मिळणार आहे. त्यानुसार सरकारी गृहयोजनेत एकदा घर मिळालेल्या व्यक्तीस त्यानंतर राज्यातील कोणत्याही योजनेत अर्ज सादर करता येणार नाही. हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. नेमके गृहधोरणात काय बदल अपेक्षित आहेत, याबाबत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.