रत्नागिरी - प्रस्तावित नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्प नाणारमधून हद्दपार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या नंतर या प्रकल्पाच्या विरोधात पहिल्यापासून विरोधात राहिलेल्या अशोक वालम यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही वालम यांनी आभार मानलेत. हा विजय नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचा असल्याची प्रतिक्रिया वालम यांनी दिली आहे.
रिफायनरी प्रकल्प विरोधामध्ये रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेची महत्त्वाची भूमिका होती. स्थानिक जनतेला सोबत घेत संघटनेचे अशोक वालम यांनी हा विरोध तीव्र केला होता. या प्रकल्पाच्या विरोधात पाच वेळा अधिवेशनाच्या काळात धरणे आंदोलनही झाले होते. दोन वेळा नागपूर आणि तीन वेळा मुंबईतल्या अधिवेशना दरम्यान नाणार प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केले होते.
या विरोधामुळे मध्यंतरी अशोक वालम यांना अटकही झाली होती. मात्र, वालम यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे एकूणच हा प्रकल्प आता या ठिकाणी होणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटना, स्थानिक यांचा मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे.