रत्नागिरी - जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. रत्नागिरी तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे चांदेराई बाजारपेठ, सोमेश्वर, काजरघाटी, पोमेंडी, गुरूमळी हा नदीकाठचा परिसर जलमय झाला.
मुसळधार पावसाने नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई किनारी भागात मंगळवारी सकाळीच पाणी भरले होते. काजळी नदीची धोक्याची पातळी ही 16.50 मीटर इतकी आहे. मात्र, पावसामुळे मंगळवारी सकाळीच नदीची पाणीपातळी 17.13 मीटर इतकी झाली होती. त्यामुळे काजळी नदीकाठच्या पोमेंडी खुर्द, काजरघाटी, सोमेश्वर, टेंभ्ये, नाचणे गुरूमळी या भागातही पुराचे पाणी भरले असून किनाऱ्यावरील शेती पाण्याखाली गेली आहे. गुरूमळी येथे पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या काही महिन्याच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. चांदेराई येथील व्यापाऱ्यांसमोर या पुरामुळे आणखी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हरचिरी पुलावरून होणारी वाहतूक देखील रोखण्यात आली आहे.
दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे घरांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी झाडे मार्गावर आडवी होऊन ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्याचे काम स्थानिक स्तरावर ग्रामस्थ करत आहेत. ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाची सर्वत्र धावपळ सुरू आहे.
कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. 4, 5 व 6 ऑगस्टला मुंबई, पालघर, ठाण्यासह कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.