रत्नागिरी - दापोली विधानसभा मतदार ( Dapoli Assembly Constituency ) संघाच्या खेड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक भरणे नाका येथील बिसू हॉटेल येथे ठेवण्यात आली होती. ही बैठक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम ( Shiv Sena district chief Sachin Kadam ) यांनी बोलावली होती. या बैठकी प्रसंगी शिवसेनेचे सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी- माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक सुरू झाल्यानंतर विविध विषय आणि पक्षाशी एकनिष्ठ राहणे, यावर जिल्हाप्रमुख कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन सुरू केले.
अजिंक्य मोरे यांनी पळ काढला - त्यानंतर माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम ( Former minister Ramdas Kadam ) यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. त्यामुळे बैठकीत उपस्थित कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या बैठकीतून माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांनी पळ काढला. परंतु, कदम समर्थकांनी त्यांना त्या हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच गाठून यापुढे माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या विरोधात जर बोलाल तर, आम्ही खपवून घेणार नाही अशी तंबी दिली आहे. शेवटी या बैठकीतून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी काढता पाय घेत बैठक गुंडाळली.
अजिंक्य मोरे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार - दरम्यान अजिंक्य मोरे आणि रामदास कदम समर्थक यांच्यात तु, तू में, में झाल्याची घटना झाली होती. त्यानंतर मोरे या बैठकीतून निघून गेले होते. मात्र, त्यानंतर मोरे यांनी बंदुकीने ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप रामदास कदम समर्थक यांनी केला आहे. त्यामुळे रामदास कदम समर्थक यांनी थेट खेड पोलीस स्टेशन गाठत मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis : पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला देवेंद्र फडणवीस रवाना