रत्नागिरी - सरबत किंवा शितपेयामध्ये तुम्ही जर बर्फ घालत असाल तर मग जरा सावधान. कारण बाजारातल्या शितपेयामध्ये घातला जाणारा बर्फ कसा तयार केला जातोय याचे धक्कादायक वास्तव आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
सध्या तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे शीतपेय पिण्याकडे लोकांचा जास्त कल असतो. ते अधिक गार लागावे म्हणून बाजारातील बर्फ त्यामध्ये घालून बिनधास्त पिण्यात येते. परंतु तो बर्फ कसा तयार केला जातो ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
रत्नागिरीतल्या पेठकिल्ला येथे बर्फ तयार करण्याचा कारखाना आहे. याठिकाणी गलिच्छपणाचा कळस गाठलेला आहे. कारखान्यात बर्फ तयार करण्यासाठी गंजलेल्या भांड्यांचा वापर करण्यात येत आहे. तसेच बर्फासाठी घाण पाण्याचा वापर करण्यात येत आहे. तर बर्फाची लादी चक्क कामगार चप्पलेचे पाय देवून काढत आहेत. हाच बर्फ आपण सरबतमध्ये किंवा शितपेयांमध्ये गारेगार म्हणून वापरतो.
अशाप्रकारे गलिच्छ आणि अस्वच्छतेत बर्फ बनवला जात असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळाली. या विभागाने करावाईचा बडगा उगारला. रत्नागिरीत बर्फ बनवणाऱ्या ६ कारखान्यांवर धडक कारवाई केली. येथील बर्फ बनवण्याचा पॅटर्न पाहूनच या कारखान्यांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश औषध प्रशासनाने दिले.