रत्नागिरी - एबी फॉर्ममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर हिंदू महासभेचे उमेदवार अजिंक्य गावडे यांचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून घोषीत झाला. त्यांनी लगेच उमेदवारी अर्ज मागे घेत चक्क आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एक नवे समिकरण पाहायला मिळणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर सनातनशी संबध असल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला. रत्नागिरीतल्या काँग्रेसभवनमध्ये बांदिवडेकर आणि गावडे या दोघांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यामध्ये गावडे यांनी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पाठींबा देत असल्याची घोषणा केली. तसेच आपण दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नवीनचंद्र बांदीवडेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा संबध सनातनशी जोडला गेला होता. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. असे असताना आता पुन्हा एकदा हिंदू महासभेच्या उमेदवाराने त्यांना पाठिंबा जाहीर केल्याने या मतदार संघात नवीन समिकरणांची नांदी पाहायला मिळणार आहे. गावडे यांनी पाठिंबा जाहीर केल्याने या मतदारसंघात आघाडीची ताकद वाढेल, असा विश्वास बांदीवडेकरांनी यावेळी व्यक्त केला.
सर्व जातीधर्मांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष सत्तेत यायला हवा. काँग्रेस सत्तेत आल्यास जातीचे राजकारण बंद होऊन सर्वांना समान न्याय मिळेल. एबी फॉर्ममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे अपक्ष लढणे मान्य नसल्याने आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे अजिंक्य गावडे यांनी यावेळी सांगितले.