रत्नागिरी- राज्यात एकीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. तर, दुसरीकडे राज्यात पावसानेही काही ठिकाणी हजेरी लावली. दापोली तालुक्यातही शनिवारी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. काही गावांमध्ये तर गाराही पडल्या.
या अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले आंबा पीक हातचे जाते की काय? याची चिंता आंबा बागायतदारांना भेडसावू लागली आहे. शनिवारी सायंकाळी दापोलीत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. तालुक्यातील जालगाव, आंजर्ले, पिचलोडी यांसह अनेक गावांत गारांसह मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी बच्चे कंपनीने या पावसाचा आनंद लुटत गारा गोळा केल्या. कोकणात सध्या आंबा व काजूचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, मुंबई व पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने तयार झालेला आंबा कोठे विक्रीस पाठवायचा हा प्रश्न बागायतदारांना पडला आहे. त्यातच आज अवकाळी पाऊस पडल्याने आंबा पिकाचे नुकसान होणार आहे. काही ठिकाणी अजून आंबा तयार झालेला नाही. तेथील आंब्यावर या पावसाचा परिणाम होणार असल्याने बागायतदार चिंतेत पडला आहे. तर, तयार आंब्याला बाजारपेठ नाही, त्यात हा पाऊस यामुळे अनेक छोटे बागायतदार धास्तावले आहेत.