रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्यालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (21 मे) कोकण दौऱ्यावर आले होते. सकाळी रत्नागिरीत विमानाने आगमन झाल्यावर विमानतळावरच त्यांनी नुकसानीचा आढावा एका बैठकीत घेतला. त्यानंतर ते लगेचच सिंधुदुर्गकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या धावत्या दौऱ्यावरून रत्नागिरीतीलही काही स्थानिक नुकसानग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'येतील अशी अपेक्षा होती, पण नाही आले'
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळाबाहेर येऊन प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाला भेट दिली असती तर बरं झालं असतं', अशी भावना काही स्थानिक नुकसानग्रस्त नागरिकांनी व्यक्त केली आहे. तर, 'कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले आहे. या वादळात मच्छिमारांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे रत्नागिरीत आलेले मुख्यमंत्री मच्छिमारांचे अश्रू पुसण्यासाठी येतील अशी आमची अपेक्षा होती. मात्र असे झाले नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे', असे मच्छिमार महेश आयरे यांनी म्हटले आहे.
'आश्वासनापेक्षा लवकर मदतीचा हात द्यावा'
'आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास चक्रीवादळाने हिरावला आहे. मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी त्यांनी आमच्या व्यथा जाणून घ्याव्यात. मुख्यमंत्र्यांनी नुसते आश्वासन न देता लवकरात लवकर आम्हाला मदतीचा हात द्यावा, अशी कळकळीची विनंती आहे', असे आंबा उत्पादक शेतकरी उद्धव पटवर्धन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरी दौऱ्यावर विरोधकांनीही टीका केली आहे. वादळापेक्षाही वेगवान दौरा मुख्यमंत्र्यांनी केला, असे विरोधकांनी म्हटले आहे.
हेही वाचा - विरार : रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण, गुन्हा दाखल