रत्नागिरी - आत्तापर्यंत वीज निर्मितीचे अनेक प्रयोग करण्यात आले. रत्नागिरीच्या मिऱ्या गावातील विनायक बंडबे यांनी 'स्लोपिंग ट्रॅक' आणि ‘रोलर’चा वापर करून वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
भारतीय शिपयार्डमधील नोकरीचा अनुभव गाठीशी बांधून विनायक यांनी समुद्रात येणार्या भरती आणि ओहोटीचा वापर करून वीजनिर्मिती केली होती. 2016 साली त्यांनी रस्त्याच्या उताराचा वापर करूनही वीज निर्मितीचा प्रयोग केला होता. मात्र, यातून मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती करणे शक्य नव्हते. त्यामुळे लोखंडी बार असलेला ‘स्लोपिंग ट्रॅक’ आणि ‘रोलर’चा वापर करून वीज निर्मिती करण्याची अभिनव कल्पना विनायक यांना सुचली.
हेही वाचा - कचऱ्यात सापडलेल्या चार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घंटागाडी कर्मचाऱ्याने महिलेला केल्या परत...
यामध्ये त्यांनी गिअर बॉक्स, मुव्हिंग रोलर, लोखंडी बार, अल्टरनेटर, जनरेटर यांचा वापर केला. एक मोठे आणि एक छोटे चाक असलेला स्लोपिंग ट्रॅक तयार करून त्यावर रोलर फिरवून अल्टरनेटरमधून वीज निर्मिती करण्यात येते. या प्रयोगासाठी त्यांनी अल्टरनेटर म्हणजे वीज निर्मिती यंत्राचाही आधार घेतला. तीन महिने परिश्रम घेवून विनायक यांनी हा प्रयोग यशस्वी केला.
विनायकच्या प्रकल्पातून 5 हजार वॅट विजेची निर्मिती झाली. यासाठी त्यांना 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च आला. हीच पद्धत वापरून मोठ्या स्वरुपात हा प्रकल्प राबवला तर त्यामधून 15 मेगावॅट विजेची निर्मिती होऊ शकेल. यासाठी 5 ते 7 कोटी रुपये खर्च येऊ शकतो, असे विनायक यांनी सांगितले. इतर पावर प्रोजेक्टमध्ये हाच खर्च 90 ते 270 कोटी रुपये इतका येतो.
हा प्रकल्प दिसायला सोपा असला तरी मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यासाठी त्या क्षमतेचे अल्टरनेटर तयार करणे हे मोठे आव्हान असेल, असे तज्ज्ञ इंजिनिअर सांगतात. सध्या इतर माध्यमातून तयार होणाऱ्या विजेचा प्रति मेगावॅट दर हा 4 कोटीपासून 13 कोटी रुपयांपर्यत जातो. यात अणुउर्जेचा खर्च प्रतिमेगावॅट 13 कोटी, औष्णिक उर्जा 6 कोटी, सौरउर्जा 11 कोटी, पवनउर्जा 8 कोटी, हायड्रोपावर 4 कोटी इतका आहे. विनायक यांनी आपल्या भन्नाट कल्पना शक्तीचा वापर पर्यावरणपुरक वीज निर्माण करण्यासाठी केला. मात्र, अशा पद्धतीच्या वीज निर्मितीसाठी मोठे प्रकल्प उभारण्यासाठी सरकार पुढाकार घेणार का? याबाबत अनिश्चितता आहे.