रत्नागिरी - खंबाटा प्रकरणावरून कोकणात सध्या राजकीय वादळ उठले आहे. खंबाटा प्रकरणावरून शिवसेना-महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे करत शिवसेना आणि स्वाभिमान पक्षावर जोरदार आसूड ओढले.
यावेळी अंजली दमानिया यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेची आणि इतर गोष्टींची पोलखोल करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात खंबाटा एव्हिएशन प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, हाच मुद्दा घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया थेट रत्नागिरीत आल्या आणि खंबाटा एव्हिएशनवरून दोन्ही पक्षाचे कसे राजकारण सुरू आहे, यांची कागदपत्रांसह पोलखोल केली.
शिवसेनेसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खंबाटा विषयासंदर्भात राजकारण करत असून मातोश्रीसह नितेश राणेंच्या मर्जीतील व्यक्तींना खंबाटामधून पगार मिळत होता, असा खळबळजनक आरोप दमानिया यांनी रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेत केला.
खंबाटावरून राजकारण करणाऱ्या राणे आणि राऊतांना कोकणच्या जनतेने मतदान करू नये, असे आवाहनदेखील दमानिया यांनी यावेळी केले. तर उद्धव ठाकरे यांना अंजली दमानिया यांनी थेट आव्हान दिले. विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांची मालमत्तेसकट एकएक गोष्ट बाहेर काढेन आणि त्यांना लढायचे कसे, हे दाखवून देईल, असा इशारा दमानिया यांनी दिला.
२०१४ सालच्या खंबाटाच्या बॅलन्सशीटमध्ये मॅनेजमेंट आणि भारतीय कामगार सेनेत व्हर्बल (तोंडी) अॅग्रिमेंट झाले होते. त्यामध्ये तिसऱ्या टप्प्यातील, पगार, बोनस, ओव्हरटाईम कामगारांना देण्याची गरज नसल्याचे भारतीय कामगार सेनेने लिहून दिले. त्यावर विनायक राऊत यांचीच सही असल्याचे सांगत गरिबांच्या तोंडचे घास कसले खाता, असा सवाल करत दमानिया यांनी शिवसेनेच्या कामगार संघटनेची पोलखोल केली. २०१७ ला उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जावून भेट घेतली गेली. त्यावेळी कामगार वाऱ्यावर जाता कामा नये, असे सांगत त्यांनी कमिटी नेमण्याचे आश्वासन दिले. मात्र, आज २०१९ सुरू असून आजतागायत त्यावर कारवाई झालेली नाही. उलट खंबाटामधून घरबसल्या कुठल्या पक्षाच्या लोकांचे पगार होत होते याची लिस्ट दमानिया यांनी उघड केली. यावेळी त्यांनी खंबाटामधून बाहेर पगार दिल्या जाणाऱ्या ५७ जणांची यादी जाहीर केली. त्यामध्ये मातोश्रीवरील ७ व्यक्ती, भारतीय कामगार सेनेच्या १५ व्यक्ती, किरण पावसकर (हे या कंपनीतील ड्युटी ऑफिसर) यांच्या ६, राज ठाकरे यांच्या २ व्यक्ती, अरुण गवळी यांची १७ माणसे आणि नितेश राणे यांच्या ७ माणसांना खंबाटामधून घरबसल्या पगार मिळत होता, असा खळबळजनक आरोप दमानिया यांनी यावेळी केला.
खंबाटा प्रकरणात दमानिया यांनी राणे कुटुंबाचीसुद्धा पोलखोल केली. नितेश राणे तुमच्या युनियनने काय केले, असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला. तर २२०० कागारांचे परिवार उघड्यावर फेकणारे विनायक राऊत हेच होते. खंबाटा कंपनी मालकाला विकायची होती. मात्र, शिवसेनेने विकू दिली नाही, असा गंभीर आरोप दमानिया यांनी शिवसेनेवर लावला आहे.
राणे आणि राऊत यांनी खंबाटाच्या नावावर राजकारण केले. मात्र, आम्ही शेवटपर्यंत हा लढा लढू, असे सांगताना राणे आणि राऊतांना कोकणच्या जनतेने मतदान करू नये, असे आवाहनदेखील दमानिया यांनी यावेळी केले. तसेच आज ८५४ कामगार आपल्यासोबत असून ईडीची चौकशी मीच लावली असल्याचे सांगताना विनायक राऊत, नितेश राणे यांच्यासह सर्वांची नावे दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खंबाटा प्रकरण आता निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा बनत चालला आहे. त्यामुळे अंजली दमानिया यांची या विषयातील एन्ट्री इथल्या लोकसभेच्या निवडणुकीत चांगलीच गाजणार एवढे मात्र नक्की.