रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे अदृश्य हात असल्यामुळे ममता बॅनर्जी बंगालमध्ये जिंकल्या असे काही जण म्हणत आहेत. मात्र, पवारांचे महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असून सुद्धा पंढरपूरची एक सीट राष्ट्रवादी जिंकू शकली नाही असा टोला भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
मग पंढरपूरची जागा राष्ट्रवादीला का जिंकता आली नाही - निलेश राणे
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीमध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवला. ही निवडणूक शेवटच्या फेऱ्यांपर्यंत अटीतटीची पाहायला मिळाली. याबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक जिंकावी म्हणून एक महिना आधीच ठाण मांडून बसले होते. मात्र, भाजपने जलवा दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला चेकमेट केले. ठाकरे सरकारमधल्या मंत्री मंडळातील मंत्र्यांच्या जाहीर सभा होऊन सुद्धा पंढरपूरकरानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला नाकारले. पश्चिम बंगालमध्ये शरद पवारांचा अदृश्य हात होता म्हणून ममता बॅनर्जी जिंकल्या, मग महाराष्ट्रात पवारांचा हात असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पंढरपूरची सीट काढता आली नाही, अशी प्रतिक्रियानिलेश राणे यांनी ट्विटरद्वारे मांडली आहे.