रत्नागिरी - नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याची घोषणा आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत केली. नगराध्यक्षपदाची प्रतिष्ठेची निवडणूक माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचेही आमदार लाड यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- बुलडाण्यात 50 वर्षीय दिव्यांग महिलेची हत्या; मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडल्याने बलात्काराचा संशय
शनिवारी संध्याकाळी जिल्हा भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत लाड बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन यांच्यासह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना लाड म्हणाले की, नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून तीनजण इच्छुक होते. यामध्ये राजीव कीर, राजेश सावंत आणि दिपक पटवर्धन यांचा समावेश होता. माजी खासदार निलेश राणे यांचा मान राखून त्यांनी सुचवलेल्या अॅड. दिपक पटवर्धन यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपकडून रत्नागिरीकरांसाठी एक सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषीत, अनुभवी उमेदवार देण्यात आला आहे. भाजप सर्व ताकदीनिशी पटवर्धन यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना विजय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे लाड यांनी यावेळी सांगितले.
निवडणुकीला सामोरे जाताना मतदारांसमोर कोणता अजेंडा घेऊन जाणार याबाबत विचारले असता लाड यांनी सांगितले की, नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक ही शहरवासियांवर लादलेली निवडणूक आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत स्वत:च्या स्वार्थासाठी नगराध्यक्षपदाचा वापर करून घेतला. शहराचा बट्याबोळ, नळपाणी योजनेतील भ्रष्टाचार, रस्त्याची दुर्दशा, रत्नागिरीतील एककलमी राजकारणाची प्रथा, महाआघाडीच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेला विकासनिधी हे प्रचाराचे मुद्दे घेऊनच आम्ही मतदारांना सामोरे जाणार आहे. नारायण राणे, निलेश राणे आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद निश्चितच वाढली आहे. भिवंडी, सोलापूर, नाशिक सारखा चमत्कार या निवडणुकीत घडला तर आश्चर्य वाटायला नको, असे लाड यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अॅड. दिपक पटवर्धन यांच्या उमेदवारीमुळे आमचे काम सोपे झाले आहे. शहर स्वत:च्या बापाचे असल्यासारखे वागणाऱ्यांच्या विरोधात आमची खरी लढाई आहे. निवडणूक हा केंद्रबिंदू धरूनच आणि जे सोबत येतील त्यांना बरोबर घेवून ही निवडणूक लढवणार आहोत,असे निलेश राणे यांनी सांगितले.