रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळ रत्नागिरीच्या किनारपट्टीपासून पुढे सरकले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. तर वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील भंडारवाडीत झाड कोसळून घराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे किनारपट्टीपासून 50 किमी दूर असलेल्या देवरुखातही निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम जाणवत आहे.
देवरुखमध्ये काल मध्यरात्रीपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरू होता. तर सकाळी 6 वाजल्यापासून पावसाने जोर धरला असून आता पावसासोबत वाराही वेगाने वाहत आहे. शहरातील भंडारवाडी येथे वाऱ्याने एक वृक्ष उन्मळून पडला. यामुळे एका घराचे आणि शौचालयाचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरीतही ठिकठिकाणी झाडे कोसळली आहेत. शिरगाव मार्गावरील बानखिंड येथे झाड कोसळल्याने शिरगावच्या दिशेने जाणारा रस्ता बंद झाला आहे. फक्त दुचाकी वाहने जाण्यासाठी जागा आहे. तर, थिबा पॅलेस येथेही झाड कोसळले आहे. गणेशगुळे कुर्धे येथील शिंदे वाडीतील ग्रामस्थ विकास शिंदे यांच्या घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले असून, दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. घराच्या बाजूला उभ्या असलेल्या सुरेश शिंदे यांच्या रिक्षावरही झाड कोसळल्याने रिक्षाचे नुकसान झाले आहे.