रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या सापडण्याचा वेग वाढलेला आहे. शुक्रवारी रात्री 26 रुग्ण सापडल्यानंतर आज(शनिवार) संध्याकाळी आणखी 22 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 48 रुग्ण नव्याने सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 256 वर गेली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी रात्री 26 कोरोना रुग्णांची भर पडल्यानंतर, आज संध्याकाळी आणखी 22 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. नव्याने आढळलेले 22 रुग्णांमध्ये रत्नागिरितील 8 , संगमेश्वर 6 आणि कामथे येथे स्वॅब घेतलेल्या 8 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 256 वर पोहोचली आहे.
1 मे पर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे अवघे 6 रुग्ण होते. यातील एकाचा मृत्यू तर 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. मात्र, 2 मेपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आणि गेल्या 29 दिवसांत तब्बल 250 रुग्ण सापडले. या रुग्णांमध्ये मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. चाकरमान्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे.
दरम्यान, आज आणखी 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 98 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 152 आहे.