रत्नागिरी- जिल्ह्यात ५ विधानसभा मतदारसंघ असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार आमदार शिवसेनेचे तर एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर निकम यांनी चिपळूण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांचा पराभव करत विजय मिळवला. आणि दहा वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून गेलेला मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीकडे खेचून आणला.
निकम कुटुंबीय आणि पवार कुटुंबियांचे तसे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कै. गोविंदराव निकम हे दोघेही एकाच विचारांचे. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर त्यांच्याबरोबर जाण्याचा पहिला निर्णय गोविंदराव निकम यांनी घेतला होता. निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेत शरद पवार यांनी वेळोवेळी सहकार्य करत आपुलकीची थाप मारलेली आहे.
गोविंदराव निकम यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र शेखर निकम यांनी देखील हा वारसा पुढे चालू ठेवला. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करत असलेले कार्य, शांत आणि मृदू स्वभाव, पक्षनिष्ठा आणि शरद पवार यांच्यासोबत असलेल्या कौटुंबिक संबंधांमुळे शेखर निकम यांची वेगळी ओळख जिल्ह्यात आहे. गेल्यावेळी पराभूत झाल्यानंतरही त्यांनी हार न मानता पुन्हा जोमाने काम केले आणि निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले.
दरम्यान, शनिवारी राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथीनंतर शेखर निकम यांनी कोणी कितीही आमिषे किंवा भीती दाखवली तरी मी शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. याबाबत ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना विचारले असता, शरद पवार हे शेखर निकम यांच्यासाठी पितृस्थानी आहेत. शरद पवार हेही आजपर्यंत शेखर निकम यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. अनेक जबाबदाऱ्याही पवार यांनी निकम यांच्यावर सोपवलेल्या होत्या. त्यामुळे एक वेळ आमदारकी गेली तरी चालेल पण शेखर निकम शरद पवार यांची साथ सोडणार नाहीत, असे कोनकर यांनी म्हटले आहे. याच संदर्भात ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.
हेही वाचा- 'खेलो इंडिया' खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या संघात रत्नागिरीच्या अपेक्षा सुतार, श्रध्दा लाडची निवड