रत्नागिरी - बिहारमध्ये ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, ते मुख्यमंत्रिपदावरून बोलणार? बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेला बोलायचा अधिकार काय? बिहारमध्ये ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले ते मुख्यमंत्रीपदावरून बोलत आहेत. संजय राऊत यांना या विषयावरती बोलण्याचा काय अधिकार, त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, असे म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला.
ज्यांच्या पक्षाचे बिहार निवडणुकीच्या निकालात डिपॉझिट जप्त झाले, त्यांना अधिकार कुणी दिला मुख्यमंत्री पदाविषयी बोलण्याचा?. संजय राऊत यांची किंमत काय समाजामध्ये? कोण आहेत संजय राऊत? एकदा तरी समाजातून निवडून आले आहेत का? संजय राऊत एका नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवू देत, त्यांना साधं गल्लीत कोणी विचारत नाही, असा टोला निलेश राणेंनी संजय राऊत यांना लगावला.
स्वतःचा कचरा कसा करायचा यावर शिवसेनेची पीएचडी
बिहार निवडणुकीच्या निकालानंतर माजी खासदार निलेश राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. बिहार निवडणुकीमध्ये शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाले आहे. स्वतःचा कचरा कसा करायचा, यावर शिवसेनेने पीएचडी केली, असल्याचा टोला निलेश राणेंनी लगावला. बिहार निवडणुकीमध्ये शिवसेनेचा देशभरात कचरा झाला, ज्या राज्यात शिवसेना उभी राहते, त्या राज्यात शिवसेनेचा पराभव होतो, आता तरी शिवसेनेने यातून धडा घ्यावा आणि महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रित करावे. इकडे तिकडे स्वतःचा कचरा करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेची कामे करावीत, असा सल्ला निलेश राणेंनी शिवसेनेला दिला.