रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आता अनेक दुकाने सुरू करण्यास काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकही आपल्या परीने खबरदारी घेताना पहायला मिळत आहेत. रत्नागिरीतही सलून दुकाने सुरू झाली असून, ते सुद्धा योग्य ती खबरदारी घेत आहे. रत्नागिरी शहरातील एका सलूनमध्ये तर पीपीई कीट घालूनच कारागीर काम करत आहेत.
सलूनमधील कारागिरांचा थेट संपर्क ग्राहकांशी येतो. त्यामुळे येथे जास्त खबरदारी घेतली जात आहे. रत्नागिरीतील कृष्णाई सलूनमध्ये तर कारागीर पीपीई कीट घालूनच काम करतात. तसेच येथे आलेल्या ग्राहकांची नोंदणी केली जाते. प्रत्येक ग्राहकाला आपले नाव आणि मोबाईल नंबर देणे देखील अनिवार्य आहे. तसेच कोरोनाची लक्षणे असलेल्या ग्राहकाला या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. शिवाय, ग्राहक गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट सॅनिटाईज केली जाते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ही सारी काळजी घेतली जात आहे. त्यामुळे सध्या सलूनमध्ये पीपीई कीट घालून काम करणाऱ्या कारागिरांची चर्चा रत्नागिरी शहरात आहे.याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.