रत्नागिरी- लाॅकडाऊनध्ये सरकारने शिथिलता दिली असून मजूर, नागरिकांना घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी आज विशेष 6 बस सोडण्यात आल्या आहेत.
हेही वाचा- बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग
लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी इच्छित स्थळी जाण्यासाठी विनंती अर्ज केले होते. प्राप्त अर्जातील पहिल्या टप्प्यात मंजूर अर्जांनुसार नागरिकांना बसमधून विविध जिल्ह्यामध्ये जाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार आज 6 बसेस सोडण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी बसस्थानकातून रायगड आणि सिंधुदुर्गसाठी दुपारी बस सोडण्यात आल्या. त्याशिवाय चिपळूण बस स्थानकातूनही सिंधुदुर्ग आणि रायगडसाठी बस सोडण्यात आल्या. तसेच दापोली बस स्थानकातूनही रायगडसाठी बस सोडण्यात आली. तर लांजा बस स्थानकातून सिंधुदुर्गसाठी बस सोडण्यात आली. या प्रत्येक बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून 22 प्रवासी पाठविण्यात आले. एसटी विभागाकडून या प्रवाशांना पाणी, जेवण व बिस्कीट देण्यात आले.
दरम्यान, शनिवारी देखील सिंधुदुर्ग, रायगड, बुलढाणा, लातूर, सातारा, भंडारा या जिल्ह्यांसाठी 16 बसचे नियोजन करण्यात आले आहे. तर रविवारी गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांसाठी तीन बसेस जिल्ह्यातून सोडण्यात येणार आहेत.