रत्नागिरी - गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तिघांवर काळाने घाला घातला. लांजा तालुक्यातील निवसर येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली. विनय सागवेकर, नंदकुमार सागवेकर आणि अनिल सागवेकर असे विहिरीत गाळ काढताना मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. रविवारी मध्यरात्री या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
निवसर मळेवाडी येथील सागवेकर कुटूंबीयांच्या विहिरीतील पाणीसाठा दुष्काळामुळे कमी झाला होता. आत गाळ साचल्याने तो काढल्यानंतर पाणीपातळी वाढेल, अशी आशा सागवेकर यांना वाटत होती. त्यामुळे विनय सागवेकर हे विहिरीतील गाळ साफ करण्यासाठी खाली उतरले. मात्र खोल विहिरीतील गाळ काढताना गॅस निर्माण झाला आणि विनय गुदमरू लागले. म्हणता म्हणता ऑक्सीजन कमी झाला. विनय बेशुद्ध पडले. बराच वेळ विनय वरती आले नाही. त्यामुळे नंदकुमार सागवेकर आणि अनिल सागवेकर हे दोघे विहिरीत उतरले. मात्र या दोघांचा सुद्धा गुदमरून विहिरीतच मृत्यू झाला. सायंकाळी ग्रामस्थांना याबाबतची माहिती मिळाली. मात्र वायू निर्माण झाल्याने पुढचा धोका ओळखून गावातील मंडळी विहिरीत उतरली नाही. याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी फिनोलेक्स कंपनीच्या आपत्कालीन यंत्रणेला पाचारण केले. त्यानंतर तब्बल ९ तासानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
निवसरमध्ये घडलेल्या या दुदैवी घटनेनंतर प्रशासनाच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहे. घटना घडल्यानंतर आपत्कालीन यंत्रणा कुठे होती, खासगी कंपनीच्या आपत्कालीन यंत्रणेची प्रशासनाला मदत का घ्यावी लागली. गावात रस्ते खराब असल्याने मदत पोहोचण्यासाठी लागलेला उशीर प्रशासनाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.