रत्नागिरी - शिमगोत्सव साजरा करून पुन्हा परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात होऊन जवळपास 25 प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.
केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचा
दापोली तालुक्यातील केळशी येथे उटंबर-मुंबई गाडीला आज सकाळी अपघात होऊन या एसटी बसमधील सुमारे पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार केले जात आहेत. समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्यासाठी बस रस्त्याच्या खाली घेतल्याचे वाहन चालकाचे म्हणणे आहे. या घटनेचे वृत्त कळताच दापोली एसटी डेपो व्यवस्थापक रेश्मा मधाळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली होती.
केळशी गावानजीक अपघात
उटंबर-मुंबई गाडी आज सकाळी मुंबईच्या दिशेने निघाली होती. केळशी गावानजीक या बसला अपघात झाला. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यामुळे केळशी गावातल्या लोकांनी धाव घेतली व तत्काळ जखमी प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर जखमी प्रवाशांना केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. बस अजून थोडी दूर गेली असती, तर मोठा अनर्थ झाला असता. कारण पुढे एका बाजूला भारजा नदी आहे. त्यामुळे मोठा अनर्थ घडला असता. परंतू सुदैवाने ही बस अलीकडेच रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली आणि मोठा अनर्थ टळला.
'वाहन चालकाच्या चुकीमुळेच अपघात'
वाहन चालकाच्या चुकीमुळेच अपघात झाल्याचा प्रवाशांनी आरोप केला आहे. या अपघातामुळे मुंबईकडे जायला निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला. बेजबाबदारपणामुळे अपघात झाला असल्याचा आरोप केला जात आहे.