रायगड - कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. यामुळे सध्या बाजारात एन-95 मास्कपासून विविध मास्कला मागणी वाढू लागली आहे. तर महिला वर्गही आपल्या ड्रेस, साडीला रंगीबेरंगी मॅचिंग मास्क वापरू लागले आहेत. यामुळे मास्क बनविणाऱ्या, घरगुती कपडे शिवणाऱ्या आणि कपडे व्यावसायिकांना कोरोना काळातही चांगला रोजगार उत्पन्न झाला आहे. याप्रकारे महिला एकीकडे फॅशनही जोपासत आहेत आणि आरोग्याची काळजीही घेत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सर्वांना आपल्या आरोग्याची चिंता वाटू लागली आहे. कोरोना विषाणू हा तोंड, नाक या अवयवांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करीत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तोंडाला मास्क लावणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून बाहेर पडताना, कार्यालयात काम करताना तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. यामुळे बाजारात एन-95 पासून तसेच घरगुती बनविलेले मास्क मिळत आहेत. या मास्कला मोठ्या प्रमाणात मागणीही वाढू लागली आहे.
मास्क तोंडाला वापरणे गरजेचे असल्याने लहानापासून वृद्धांपर्यंत सर्वच जण मास्कचा वापर करताना पाहायला मिळत आहेत. त्यात कामावर जाणाऱ्या महिला तसेच गृहिणींचाही समावेश आहे. सर्वच महिला आपण छान दिसावे यासाठी ड्रेस, साडीवर मॅचिंग ज्वेलरी, टिकल्या, बांगड्या घालीत असतात. आता यामध्ये मॅचिंग मास्कच्या रुपाने आणखी एकाची भर पडली आहे.
हेही वाचा - राज्यात 5 हजार 368 नवे कोरोनाबाधित; तर 204 मृत्यू
कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असताना महिला वर्ग यामध्येही फॅशन करू लागल्या आहेत. महिला बाजारातून अथवा टेलरींग काम करणाऱ्या घरगुती महिला यांच्यामार्फत रंगीबेरंगी मॅचिंग मास्क खरेदी करू लागल्या आहेत. यामुळे महिला एकीकडे सुरक्षाही जपत आणि फॅशनही जोपासत आहेत, अशी भावना नोकरदार असलेल्या चित्रा मोरे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केली.
कोरोना काळात शासनाने तीन महिने टाळेबंदी केल्याने आमचा व्यवसाय ठप्प झाला होता. टाळेबंदी उठवली गेली तरी घरगुती व्यवसाय करणाऱ्या आम्हा व्यावसायिकांना काही प्रमाणात फटका बसला आहे. मात्र, याच कोरोनामुळे मास्क बनवून ते विकु लागल्याने पुन्हा व्यवसाय बहरू लागला आहे. महिला वर्गाला प्रत्येक बाबतीत मॅचिंग लागत असल्याने महिलांच्या मागणीनुसार मास्क बनवून देत आहे. आतापर्यंत हजाराहून अधिक मास्क विकले गेले आहेत. रोज 50 ते 60 मास्कची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया घरगुती टेलर व्यावसायिक योगिता मोरे यांनी व्यक्त केली.
आमचा कपड्याचा व्यवसाय आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे मिळतात. सध्या मास्क वापरणे गरजेचे असल्याने महिला वर्ग रंगीबेरंगी कापड खरेदी करून आपल्या मॅचिंग ड्रेस, साडीनुसार मास्क शिवून घेत आहेत. त्यामुळे रंगीबेरंगी कपड्याना मागणी वाढली आहे, असे गारमेंट व्यावसायिक रिषभ जैन यांनी सांगितले. याप्रकारे महिला एकीकडे फॅशनही जोपासत आहेत आणि आरोग्याची काळजीही घेत आहेत.