रायगड - विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आहेत. प्रत्येक उमेदवार घरोघरी फिरून आपल्या आश्वासनांचा पाढा वाचताना दिसतो आहे. लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या जात आहेत. पण पनवेलमध्ये एक आवाज हळूहळू ऐकू येऊ लागलाय. No Water, No Vote आधी पाणी द्या मगच मतदान. पनवेलमधला ग्रामीण भाग असो किंवा मग शहरी भाग, कानाकोपऱ्यातून एकच घोषणा ऐकू येऊ लागली आहे. जर प्यायला पाणी नाही, मग वोट पण नाही.
पनवेलकरांना मेट्रो मिळाली पण पिण्याच्या पाण्यासाठी मात्र आजही आंदोलनं करावी लागत आहेत. सिडकोने वसवलेल्या पनवेलमधील अनेक वसाहती या पाणीटंचाईने वर्षभरापासून त्रस्त आहे. कधी एक तर कधी चार चार दिवसांआड होतो पाणीपुरवठा. २४ तास नळाकडे डोळे लावून बसावे लागते. त्यातही घरात पाणी आले नाही म्हणून नाईलाजास्तव खिशातून 1500 ते 2500 रुपये खर्च करून टँकरने पाणी मागवावे लागते. ही बाब टँकरमाफियांच्या पथ्यावर पडली आहे. विकासाच्या मोठं मोठ्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनी कधी तरी या वसाहतीतही प्रचारफेरी करावी, ही लोक पाण्यासाठी किती त्रस्त आहेत. हे कळले, तरी आतापर्यंत पनवेलकरांनी आमदार, नगरसेवकांकडे तक्रार करूनही हा प्रश्न सुटत नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी आता थेट No Water, No Vote चा पवित्रा घेऊन थेट मतदानावरच बहिष्कार टाकला आहे.
कामोठेतल्या या वसाहती तहानलेल्या तर आहेत. मात्र, इथल्या नागरिकांच्या वाट्याला आलेले खड्डे आता परतीचा पाऊस सुरू झाला तरी मिटण्याची नावं घेत नाहीत. हे खड्डे दररोज अपघातांना आमंत्रण देत आहेत. याच खड्ड्याच्या रस्त्यावरून पुढाऱ्यांच्या प्रचार फेऱ्या ही जात असतील, पण यांचा आवाज मात्र अजून पोहोचला नाही.
रोडपाली येथली द स्प्रिंग सोसायटीत गेल्या 19 दिवसांपासून पाण्याचा थेंबही आलेला नाही. पाण्याशिवाय गेले 19 दिवस कसे काढले असतील हे त्यांनाच ठाऊक. तळोजा, कळंबोली, रोडपली या भागातली परिस्थिती काही वेगळी नाही. पनवेलकराना पाण्यासाठी कधी हंडा मोर्चा काढला कधी उपोषण केले. नेतेही आले, आश्वासनही दिली की पनवेलकरांना पाणी देऊ. आता ही आश्वासन पाण्यासारखीच वाहून गेली आहेत. त्यामुळे आता यांनी ठरवले आहे चला, पाणी नाही, तर मग मत नाही'. आता मतांसाठी तर नेते पनवेलकरांच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढतात का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.