रायगड - शाळेत दिलेला अभ्यास केला नाही म्हणून निर्दयी शिक्षकाने चौथीच्या लहानग्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना 13 ऑगस्टला रेवदंडा हायस्कूलमध्ये घडली होती. याबाबत पालकांनी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी या शिक्षकाला बदली होईपर्यत सक्तीच्या रजेवर पाठवून दिले आहे. मात्र या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भिमासिंग राठोड असे या शिक्षकाचे नाव आहे.
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हायस्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षक भिमासिंग राठोड याने घरी अभ्यास करण्यास दिला होता. मात्र, विद्यार्थ्याने अभ्यास पूर्ण केला नव्हता. त्यामुळे निर्दयी शिक्षक भिमासिंग राठोड याने त्या चिमुकल्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा उठल्या आहेत.
विद्यार्थ्याने घरी आल्यानंतर सदरचा मारहाणीचा प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी त्वरित रेवदंडा पोलीस ठाणे गाठून शिक्षकाविरोधात तक्रार करण्यास गेले. मात्र, पोलिसांनी आधी शाळेतील मुख्यध्यापक याच्याशी बोला, असे सांगितले. त्यामुळे पालक हतबल झाले. पालकांनी शाळेत येऊन शिक्षकांशी संपर्क करून मारहाणीबाबत जाब विचारला असता, अभ्यास केला नाही म्हणून मारले असे उत्तर दिले. त्यामुळे पालक संतप्त झाले. या घटनेची परिसरात चर्चा सुरू झाली.
विद्यार्थ्यांच्या मारहाणीबाबत शिवसेना व युवा पदाधिकारी यांनी शाळेच्या मुख्याध्यापक यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी झाला प्रकार हा खेदजनक असून शिक्षकास बदली होईपर्यत सक्तीच्या रजेवर पाठवीत असून लवकरच त्याची बदली करू, असे आश्वासन मुख्याध्यापक यांनी दिले.
मुलांनी अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकांनी ओरडणे किंवा काही सौम्य शिक्षा देणे ठीक आहे. मात्र, पाठीवर वळ उठेपर्यंत मारणे हे म्हणजे निर्दयीपणाचे लक्षण आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना शिक्षकी पेशात ठेवणे म्हणजे शिक्षकी पेशाला काळिमा आहे, अशा प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहेत.