रायगड - मुंबई-पुणे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी व वाढते प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्र राज्य रस्ते बांधकाम महामंडळाने पर्यायी 4 हजार 800 कोटींचा मिसिंग लिंक प्रकल्प निर्माण करण्याचे ठरविले आहे. या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे साधारण 7 ते 8 किलोमीटरचे अंतर कमी होऊन 20 ते 25 मिनिटांची वेळेची बचत होणार आहे. या प्रकल्पाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पामुळे बोरघाटातील वळणाच्या रस्त्यापासून प्रवाशांची सुटका होणार आहे.
मिसिंग लिंक हा प्रकल्प खालापूर टोळ ते कुसगाव दरम्यान होणार आहे. या प्रकल्पात 2 बोगदे वायरने बांधणार आहेत. खालापूर ते खोपोली एक्झिट रस्ता हा सध्या 6 पदरी असून तो 8 पदरी करण्यात येणार आहे. त्यामुळे खालापूर, तळेगाव, शेडुंग या पथकाराची क्षमता वाढवण्यात येणार आहे.
खोपोलीपासून हा मिसिंग लिंक सुरू होणार असून दोन्ही मार्गिका या चारपदरी असणार आहेत. मिसिंग लिंकचा पहिला पूल हा 770 मीटर लांब व 30 मीटर उंचीचा असणार आहे. 4 पदरी रस्ता ट्वीन पद्धतीने असून पहिला ट्वीन 1 पूर्णांक 6 किलोमीटर तर दुसरा 1 पूर्णांक 12 किलोमीटर टनेल असणार आहे. यामध्ये एक आधुनिक केबल सेतू असणार असून तो 645 मीटर लांब व 135 मीटर उंच असणार आहे. केबल सेतू हा देशातील पहिलाच अविष्कार असणार आहे. या केबल सेतूचे काम शापुरजी पालनजी या कंपनीला देण्यात येणार आहे.
मिसिंग लिंकमध्ये बनविण्यात येणारे बोगदे हे शार्डद्वारे जोडले जाणार आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडणे सोपे जाणार आहे. टनेल ही जमिनीखाली साधारण 150 मीटर अंतरावर बांधण्यात येणार आहेत. मिसिंग लिंकमुळे खर्च, इंधन बचत, वायू व ध्वनी प्रदूषण कमी होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्प हा आधुनिक पद्धतीने बनविण्यात येणार असल्याने प्रवास करताना निसर्गाचा आनंदही लुटता येणार आहे.