रायगड - सुधागड तालुक्यात पाली वनविभागाने खवल्या मांजराची तस्करी करणार्या सात तस्कराना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. वन विभागाने पकडलेल्या सात आरोपींना पाली न्यायालयात हजर केले असता ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर सुधागड तालुका दुर्मीळ वन्यजीव प्राणी व त्यांच्या अवशेषांची तस्करी करणारे केंद्र बनले आहे. वनविभागाने आरोपीकडून ताब्यात घेतलेल्या खवल्या मांजराची बाजारामध्ये करोडोची किंमत आहे.
पाली वनक्षेत्रपाल सुधागड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारमधून खवल्या मांजराची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वन विभागाने सापळा रचला होता. पाली वाकण रोडवरील पिराचा माळ येथे मारुती सुझुकी वॅगनआर एलएक्सआय कार (एमएच ०६/ एएस १७५१) आली असता, दबा धरून बसलेल्या वन विभागाच्या पथकाने कार थांबवून तपासणी केली. कारची तपासणी केली असता डिक्कीत गोणपाटात झाकून ठेवलेले खवले मांजर व एक पिल्लु आढळून आले. हे खवले मांजर व पिल्लू यांचे साडे नऊ किलो वजन असून बाजरामध्ये या खवल्या मांजराची करोडो रुपये किंमत आहे.
वनविभागाने केलेल्या या कारवाईत मारुती सुझुकी वॅगनआर एलएक्सआय कार (एमएच ०६/ एएस १७५१) किंमत २ लाख रुपये, होंडा फॅशन गाडी क्रमांक (एमएच ०६/ बी.झेड. ४१३०) किंमत ४० हजार जप्त केली आहे. तसेच अशोक बबन वाघमारे (वय २७ रा. पंदेरी, ता. मंडणगड), शौकत नशिर मोमीन (वय ४४), सुनील काशिनाथ माने (रा. पोयनाड, ता. अलिबाग) यांच्यासह त्यांचे सोबत असणारे चंद्रहास शंकर पाटील (वय ४९ रा. मु. डोलवी, ता.पेण), नितीन नारायण पाटील (वय ३५ रा. सातघर, ता. अलिबाग), संदीप दत्ताराम हिलम (वय ३९ रा. कुंभशेत, ता. माणगाव) ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील (वय ४४ रा. शेतजुई) या सात जणांना वन विभागाने अटक केली आहे. आरोपीविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, ९ मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे, वनपाल जी.बी परहर, महेंद्र दबडे व मजरे जांभुळपाडा वनविभाग कर्मचारी यांनी पार पाडली. अंधश्रध्दा, काळीजादू, व औषधासाठी दुर्मीळ वन्यजिवांची तस्करी करणार्या तस्करांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुधागड तालुक्यात वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी दुर्मीळ प्रजातीचे व करोडे रुपये किमतीचे मांडुळाची तस्करी करणार्यांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तसेच बिबट्याच्या नख्यांची तस्करी करणार्यांना देखील वनविभागाने पकडून कारवाई केली होती. त्यामुळे सुधागड तालुका दुर्मीळ वन्यजिव प्राणी व त्यांच्या अवशेषांची तस्करी करणारे केंद्र बनले आहे.