रायगड - जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यंदा उशिरा जरी मान्सुनचे आगमन झाले असले तरी चांगल्या सुरुवातीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतीच्या कामालाही सुरुवात झाली असून भात लावणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. तर, कृषी विभागाकडून शेतीसाठी लागणारे खत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यत ४० टक्के खत वाटप झालेले आहे.
जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गात नाराजी होती. शेतकऱ्यांनी भाताचे राब जमिनीत टाकले होते. पावसाने दडी मारल्याने भाताची जमिनीवर आलेले रोपे करपण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी सुखावला आहे.
पावसाने सुरुवात केल्याने शेतीची लावणी करण्यासाठी शेतात पाणी साचले आहे. भाताचे रोपेही चांगली बहरून आली असल्याने शेतकऱ्याने भात लावणी सुरू केली आहे. रोपाची मूठ बांधून ती शेतात लावण्याचे काम सुरू झाले आहे. भात लावणी करण्यासाठी जमिनीची नांगरणी ही सुरू झाली आहे.
पूर्वी शेतात बैल जोडीने शेती नांगरणी केली जात होती. मात्र, बैल नागरणीच्या जागेवर आता विद्युत टिलरच्या सहाय्याने नांगरणी होताना दिसत आहे. भात लावणीसाठी येणाऱ्या पुरुषांना आणि महिलांना ३०० रुपये मजुरी मिळत असल्याने शेती लावण्याच्या कामानिमित्त रोजगारही मिळत आहे.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खत वाटप सुरू केले असून ४० टक्के खत वाटप पूर्ण झाले आहे. शेतकरी हे शेती पूर्ण लावून झाल्यानंतर शेतात खत टाकतात. त्यामुळे शेती लावणी पूर्ण झाल्यानंतर खत खरेदीसाठी शेतकऱ्याकडून मागणी वाढत असते. कृषी विभागाने त्यादृष्टीने खत पुरवठा उपलब्ध करून दिला आहे.