रायगड - कोरोना काळात महाराष्ट्राने कोरोनाने झालेला मृत्यूदर लपविलेला नाही. मृत्यूदर कोणी लपवला हे पहायचे असेल तर गंगेच्या काठावर फिरावे लागेल. देवेंद्र फडणवीस हे नैराश्यात असून त्यांनी माझ्यावर आणि आघाडीवर टीका करण्यापेक्षा उत्तर प्रदेशकडे लक्ष द्यावे, अशी जहरी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात थोरातांनी घेतली आढावा बैठक
तौक्ते चक्रीवादळ आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने महसूल मंत्री हे अलिबाग येथे आले होते. जिल्हाधिकारी कार्यलयात बाळासाहेब थोरात यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी निधी चौधरी, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा युवक अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील, तालुकाप्रमुख योगेश मगर, अॅड. प्रवीण ठाकूर यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेवर उत्तर दिले.
'देवेंद्र फडणवीसांना नैराश्य आले'
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यतील मृत्यू दराबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली होती. राज्याने कोरोना काळात झालेला मृत्यूदर अद्यापही लपविलेला नाही. कोरोना काळात महाविकास आघाडी शासन उत्तम काम करीत असून जनतेने तसा निर्वाळा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना नैराश्य आले आहे. उत्तर प्रदेश सरकारने गंगेच्या पात्रात मृतदेह सोडले, गंगेच्या किनारी गाडले. त्यामुळे मृत्यूदर कोणी लपवला हे पहायचे असेल तर गंगेच्या काठावर फिरावे लागेल. त्यामुळे फडणवीस यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा तिकडे लक्ष द्या, असा सणसणीत टोला फडणवीस यांना लगावला आहे.
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने दिल्या सूचना
तौक्ते चक्रीवादळ आणि कोरोना उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. प्रशासनाकडून योग्य पद्धतीने काम सुरू असल्याचेही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा - 'अनलॉक'वरून विरोधकांच्या हातात आयते कोलीत; तर काँग्रेसकडून सारवासारव