रायगड - कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे किल्ले रायगडावर 27 एप्रिल रोजी आयोजित शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. कोरोनामुळे 125 वर्षाची परंपरा खंडित झाली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे शिवपुण्यतिथी कार्यक्रम रद्द -
जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. या कार्यक्रमामधून कोरोना वाढण्याची शक्यता जास्त असते. परिणामी २७ एप्रिल रोजी किल्ले रायगडवर आयोजित शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोना संक्रमण वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 125 वर्ष हा अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
घरूनच अभिवादन करण्याचे आवाहन -
२७ एप्रिल रोजी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमासाठी कुणीही गडावर येऊ नये. आपल्या निवासस्थानाहूनच रायगडच्या दिशेने फुले समर्पित करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.