रायगड - रायगड जिल्ह्यात चक्रीवादळाने विजेचे खांब, तारा पडून विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे मोबाइल चार्जिंगची व्यवस्था नाही. तसेच, मोबाइल नेटवर्कही गेले आहे. आता आपल्या नातेवाइकांना ख्यालीखुशाली कळवण्यासाठीही संपर्क होऊ शकत नाही. नागरिकांची ही अडचण ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी एक सुविधा उपलब्ध केली आहे.
रायगड पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे #ConnectingPeople ही सुविधा सुरू केली आहे. चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रामधील आपल्या कुटुंबीयांची माहिती जाणून घेणे, या सुविधेमुळे सोपे झाले आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा अलिबाग, मुरुड, रोहा, नागोठणे, पेण, श्रीवर्धन, माणगाव, मसाला, तळा या तालुक्यांना सर्वाधिक पडला आहे. वादळाने रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब, तारा, डीपी पडून विजेचा खेळखंडोबा झाला. अनेक रायगडकरांची घरे उद्ध्वस्त झाली. वीज नसल्याने मोबाईल बंद झाले. त्यामुळे गावगावांचा तसेच नागरिकांचा नातेवाइकांशी संपर्क तुटला. अशा कठीण परिस्थिती आपल्या नातेवाइकांची विचारपूस कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणूनच रायगड पोलिसांनी आपल्या ट्विटरहँडलवर 'कनेक्टिंग पीपल' ही सुविधा सुरू केली आहे.
या ट्विटवर कोणाला संपर्क करायचा त्याचे नाव, पत्ता ही माहिती द्यायची आहे. त्या माहितीच्या आधारे पोलीस त्या नातेवाइकांशी संपर्क करून त्याची माहिती दुसऱ्या नातेवाईकांना ट्विटरद्वारे देण्यात येणार आहे. आतापर्यंत 15 नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.