रायगड- खालापूर फाट्याजवळ एका ट्रेलरने मोटारसायकलला धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत मोटारसायकस्वार जागीच ठार झाला आहे. धनंजय गोपीनाथ पाटील असे त्या मृत मोटारसायकस्वाराचे नाव असून ते पाली येथील माजी आमदार मा. धैर्यशील पाटील यांचे सहकारी आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते होते.
फरफटत नेल्याने गंभीर जखमी
शुक्रवारी रात्री खालापूर फाट्याजवळ एका ट्रेलरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की एक जण जोरात फेकला गेला तर धनंजय पाटील ट्रेलरखाली आले. मात्र, यानंतरही चालकाने ट्रेलर थांबवला नसल्याने ट्रेलरखाली अडकलेले पाटील गंभीर जखमी झाले. पाटील यांची सुरू असलेली तडफड पाहून त्याठिकाणी खालापूरातील तरूण स्वप्निल गव्हाणकर, सनिल कडू, माजी नगरसेवक अवधुत भुर्के सह चेतन मानकामे मदतीला धावले. पाटील आणि त्यांच्या सोबत असलेला पंकजला खालापूर आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, पाटील यांचा मृत्यू झाला होता.
चालकाला पकडण्यासाठी पोलिसांचा चौदा किलोमीटर पाठलागाचा
अपघातानंतर पळून जाणा-या ट्रेलरचा पोलीस शिपाई धनंजय धडस यांनी कारमधून पाठलाग केला. परंतू शंभर पेक्षा अधिक वेगाने ट्रेलर चालक ट्रेलर चालवत होता. धडस यांनी फोनवरून सदरचा प्रकार पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांना सांगितला. विभुते यांनी तातडीने दांडफाटा येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. मात्र, दांडफाटा येथे नाकाबंदी पाहून ट्रेलर चालकाने अंधारात पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली आहे.