रायगड- 28 जुलै 2018 ची ती सकाळ दापोली कृषी विद्यापीठातील 30 जणांसाठी काळी सकाळ ठरली होती. पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात झालेल्या दापोली कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बस अपघात झाला होता. त्या अपघाताच्या थरारक घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. प्रकाश सावंत देसाई ही एकमेव व्यक्ती या अपघातामधून बचावली होती.आज 28 जुलै रोजी पुन्हा एकदा या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
दापोली कृषी विद्यापीठाचे 31 कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी पावसाळी सहलीसाठी निघाले होते. यासाठी सकाळी सर्वजण कृषी विद्यापीठाच्या बसने मजा करीत निघाले होते. पोलादपूर वरून महाबळेश्वरकडे जाताना आंबेनळी घाटात बस आली असता, चालकाचे नियंत्रण सुटून बस आठशे फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात सकाळच्या वेळी झाला होता. या अपघातात बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाली. अपघातात बस आठशे फूट खोल दरीत कोसळल्याने कोणी जिवंत असेल अशी आशा वाटत नव्हती. जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले.
आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक ग्रामस्थ व ट्रेकर यांच्या सहाय्याने अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना एक एक करून वर काढण्यात आले. एनडीआरएफ टीम येईपर्यंत ट्रेकर व स्थानिकांच्या मदतीने 15 ते 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. एनडीआरएफ टीम आल्यानंतर उरलेले मृतदेह काढण्यात आले. 600 फूट खोल दरीतून मृतदेह काढताना खराब वातावरणामुळे अडचणी येत होत्या. तरीही सर्व मृतदेह काढण्यात यश आले होते. अपघातात बसचा मात्र चुराडा झाला होता. अपघातातील बस दोन महिन्यानंतर बाहेर काढण्यात आली होती.
नातेवाईकांचा आक्रोश, आणि देसाईंवर संशय-
आंबेनळी घाटात झालेल्या या अपघातानंतर नातेवाईकांनी पोलादपूरकडे धाव घेतली होती. त्यावेळी नातेवाईकांच्या आक्रोशाने प्रत्येक जण हेलावले होते. या अपघातात मृत्यू पडलेल्या पैकी काहींची नवीनच लग्न झालेले होते. काही जण घरातील एकुलता एक आधार होता. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया पसरली होती. या अपघातात वाचलेले प्रकाश सावंत देसाई याच्याबाबत मृतांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. त्याच्यावर कारवाई करा असा पवित्र घेतला होता. मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आज 28 जुलै 2019 रोजी दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी यांचा आंबेनळी घाट अपघाताच्या दुर्देवी दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या अपघाताची आठवणी ताज्या झाल्या आहेत.