रायगड - कोविड महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले, याचा आघात हा अनेकांच्या मनावर झालेला आहे. कोविडच्या संकटामुळे अनेक व्यक्तींना मानसिक आजाराला सामोरे जावे लागले आहे. जिल्ह्यात 2019-20 वर्षापेक्षा 2020-21 वर्षात मानसिक रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 मध्ये 19 हजार 597 मानसिक रुग्ण होते. कोरोना सुरू झाल्यानंतर एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यत 21 हजार 612 रुग्ण मानसिक आजाराने त्रस्त झाले असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मानसोपचार तज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी दिली आहे.
कोरोनामुळे मानसिक संतुलन बिघडले -
मार्च 2020 पासून देशात कोरोना महामारीने डोके वर काढले. त्यामुळे केंद्राने आणि राज्याने टाळेबंदी जाहीर केली. टाळेबंदी जाहीर झाल्याने सर्व व्यवहार, कामकाज ठप्प झाले. अनेकांची यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाली. कंपन्या बंद झाल्या, हाताला काम नाही यामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. कोरोनामुळे घरातून बाहेर पडण्यास बंदी असल्याने एकलकोंडेपणा आला. समाजापासून दूर राहावे लागले. नागरिक घरात असल्याने मोबाईल वापर वाढला. झोपेचे प्रमाण वाढले. त्यामुळे अनेक व्यक्तींना मानसिक आजार जडू लागले. त्यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसोपचार विभागात रुग्ण वाढले -
कोरोनामुळे कुटुंब हे सहा ते सात महिने एकत्रित राहिले असले, तरी काही जणांना या परिस्थितीची सवय नसल्याने मानसिक आजार जडू लागले. कोरोनामुळे मद्य दुकाने बंद असल्याने अनेक मद्यपींंना दारू न मिळाल्याने त्यांची परिस्थिती बिघडली आहे. पती पत्नीमध्येही खटके उडू लागल्याने अनेक दाम्पत्यांमध्ये मानसिक आजार बळावू लागला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुगणलायत मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. यात एक आनंदाची बाब म्हणजे जे पक्के दारुडे होते, अशा काही जणांचे दारू पिण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे डॉ. अमोल भुसारे यांनी सांगितले.
मानसोपचार विभागातर्फे उल्लेखनीय काम -
कोरोनामुळे मानसिक रुग्ण संख्येत मोठ्या परिमाण वाढ झालेली असली, तरी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाकडून रुग्णावर योग्य पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. कोरोना झाल्यानंतर काय करावे, अशी भीती प्रत्येक फ्रंट वर्कर कर्मचारी, अधिकारी यांच्या मनात होती. याबाबत मानसोपचार विभागातर्फे जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालये, रुग्णालय येथे जाऊन शिबिरे आयोजित करण्यात आले होते. कोरोना पॉझिटीव्ह झालेल्यांपैकी 4 हजार रुग्णांसोबत टेलिफोनीक पद्धतीने संभाषण केले. फिझिकल तपासणी 4 हजार 500 जणांची करण्यात आली. यामध्ये 565 जणांना मानसिक आजार जडला असून त्यांना योग्य उपचार देऊन पूर्वरत केले आहे, अशी माहिती मानसोपचार तज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - नागपूर; दादागिरी करणाऱ्या गुंडाची जमावाने केली दगडाने ठेचून हत्या