रायगड - अनव्य नाईक आत्महत्या प्रकरणात अंतरिम जामिनावर असलेल्या नितेश सरडा आणि फिरोज शेख याचा जिल्हा सत्र न्यायालयात असलेला जामीन अर्ज आज त्यांच्या वकिलांनी मागे घेतला. रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेबाबत अद्याप निर्णय प्रलंबित आहे. आज न्यायालय याबाबत निर्णय देणार की, सुनावणीची पुढील तारीख देणार, हे दुपार सत्रात कळणार आहे.
अनव्य नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख यांना रायगड पोलिसांनी अटक केली होती. या तिघांना जिल्हा न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयाने तिघांचाही अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला होता. त्यानंतर अर्णब गोस्वामीने जिल्हा सत्र न्यायालयातील आपला जामीन अर्ज वकिलामार्फत मागे घेतला होता. मात्र, नितेश सरडा आणि फिरोज शेख यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत आल्यानंतर अर्ज मागे घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे या दोघांनी आपला जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयातून काढला नव्हता.
जामीन अर्ज मागे -
जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जे.मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात आज नितेश सरडा आणि फिरोज शेख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालय सुरू होताच दोघांच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेण्याचा अर्ज दाखल केला. त्यामुळे दोघांचेही जामीन अर्ज मागे घेण्यात आले आहेत.
पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेबाबत अजून निर्णय बाकी -
रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मात्र, सकाळच्या सत्रात याबाबत न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे दुपारनंतर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - विधान परिषद निवडणूक : ५८ वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला नागपुरात खिंडार, पुण्याचाही गड केला काबीज