पनवेल - मावळ लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणापासून ते अगदी उलट्या ट्रेनचा प्रवास आणि सभा नसतानाही केलेल्या धावपळीवरून, अशा अनेक गोष्टींमुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. यावर पार्थ पवारच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे पार्थ पवार ट्रोल होत आहेत. मात्र, निवडणूक म्हटलं की ट्रोलिंग होणारच. हे काही नवीन नाही, असे सांगून सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवारांची पाठराखण केली आहे.
मुलगा पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आजोबा शरद पवार, वडील अजित पवार यांच्यापाठोपाठ आता आई सुनेत्रा पवार या देखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आई सुनेत्रा पवार यांनी नुकतीच पनवेलकरांची भेट घेतली. पनवेल, कळंबोली,कोपरा, खारघर या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाम भेटी दिल्या.
हे फार मनाला लावून घ्यायचं नसतं-
यावेळी त्यांनी मुलगा पार्थ पवार यांच्यावर होणाऱया ट्रोलिंगवर ही भाष्य केले. राजकारण आणि निवडणुका म्हटल्या, की ट्रोलिंग ही आपसूक येतंच. हे फार मनाला लावून घ्यायचं नसतं. विरोधकांनी गेल्या ५ वर्षात काय काय बदल केले आहेत, हे जनतेला चांगलं माहीत आहे, असं बोलून त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
पार्थ पवार यांना त्यांच्या लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. त्यामुळे पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातुन निवडून आल्यानंतर ते येथील नागरिकांच्या समस्या नक्कीच सोडवतील म्हणुनच पार्थ यांना मावळ मतदारसंघातुन उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. शिवाय डॉक्टरांचा मुलगा हा डॉक्टर होतो. मग पार्थ पवार हे राजकारणात का नको, असा सवालही यावेळी सुनेत्रा पवार यांनी केला.