रायगड - कोरोनाच्या या संकटकाळात आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची परिस्थितीही घारी सारखी झाली आहे. असे असले तरी कोरोनाच्या कठीण परिस्थितीत आरोग्य यंत्रणेतील महिला डॉक्टर, आरोग्य सेविका आपली कुटूंब आणि रुग्णालयातील सेवेची जबाबदारी चोख बजावत आहेत. आज जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालयातील फिजिशियन डॉ. अपूर्वा सौरभ पाटील यांच्या कार्याचा घेतलेला 'ई़टीव्ही भारत' ने घेतलेला आढावा.
दीड वर्षांपासून करीत आहेत कोविड रुग्णांवर उपचार
मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि सगळीकडे हाह:कार माजला. रायगड जिल्ह्यातही कोरोनाने पाय पसरवण्यास सुरुवात केली आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयात जानेवारी 2020 पासून डॉ. अपूर्वा सौरभ पाटील ह्या रुजू झाल्या. त्यानंतर मार्च 2020 पासून कोरोना सुरु झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या एका योद्धा प्रमाणे रुग्णावर उपचार करीत आहेत.
दीड वर्षाच्या मुलाला घरी ठेवून रुग्णसेवा
डॉ. अपूर्वा पाटील यांना दीड वर्षाचा मुलगा आहे. तो चार महिन्याचा असल्यापासून डॉ. अपूर्वा कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णावर उपचार करीत आहेत. आतापर्यत हजारो रुग्णावर त्यांनी उपचार केले आहेत. दिवस आणि रात्र पाळीत त्या काम करीत आहेत. त्यामुळे एकीकडे मुलगा लहान तर दुसरीकडे रुग्णाची सेवा अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहे.
'कुटूंबाचा मिळत आहे भक्कम पाठिंबा'
कोरोनाची आलेली दुसरी लाट ही भयंकर आहे. त्यामुळे दिवसरात्र रुग्णालयात काम करावे लागत आहे. मुलगा हा आता दीड वर्षाचा झाला असून माझे सासू सासरे, आई वडील, पती मला सांभाळून घेऊन मुलांचाही सांभाळ करीत आहेत. त्यामुळे माझे काम मी करीत आहेत. कोरोना काळात आमच्या सारख्या महिलांना कुटूंबाचा भक्कम आधार मिळत असल्याने घर आणि कामाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहोत, अशी प्रतिक्रिया डॉ. अपूर्वा पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा -मातृदिन विशेष : अवघ्या ४ महिन्याच्या बाळाला घरी ठेऊन पुन्हा कामावर रुजू