रायगड - खोपोली जवळील ढेकू-साजगांव औद्योगिक क्षेत्रातील प्रसोल केमिकल कंपनीत डी ए रिकव्हरी विभागात बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा स्फोट होऊन मोठी आग लागली. दरम्यान कंपनीतील औद्योगिक सुरक्षा यंत्रणा व आपत्कालीन व्यवस्थापन कडून तातडीने योग्य उपाययोजना केल्याने ही आग नियंत्रणात आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मात्र कंपनीतील एका उत्पादन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र या धुराच्या लोटाने नागरिकांना दमछाक झाली होती.
तातडीने उपाययोजना झाल्याने मोठी दुर्घटना टळली
याच परिसरातील जस्नोव्हा केमिकल कंपनीतील असाच स्फोट झाला होता. यात अनेकांचे बळी गेले होते. ही नुकसानाची घटना ताजी असतांना प्रसोल कंपनीतील या स्फोटाच्या घटनेने संपुर्ण परिसरात प्रचंड भीती व घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राथमिक माहिती नुसार, कंपनीतील डी ए रिकव्हरी विभागात उत्पादन विभागात रासायनिक प्रक्रिया सुरू असताना स्टॅटिक चार्ज निर्माण होऊन हा स्फोट झाल्याचे समजत आहे. दरम्यान कंपनीतील औद्योगिक सुरक्षा यंत्रणा व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी तातडीने उचित उपाययोजना झाल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. सदर घटनेत कोणीही जखमी नसून सुदैवाने जीवितहानी ही झाली नाही.
या घटने बाबत कंपनी मुख्य व्यवस्थापक सचिन प्रभू यांना वारंवार संपर्क साधला असता, त्यांचा संपर्क झाला नाही. या घटनेनंतर खोपोली पोलीस प्रशासनाने व तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील सविस्तर माहिती घेतली जात आहे.
प्रसोल केमिकल कारखान्यात कारखान्याची व्याप्ती वाढविण्यासाठी स्थानिकांनी आक्षेप घेतला होता, मात्र प्रशासनाने सुनावणीच्या दरम्यान कारखान्याला अभय देत नागरिकांच्या सुरक्षेची हमी घेण्याची व उद्योग वाढविण्यासाठी अभय दिले. मात्र या कारखान्यामुळे भोपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, हीच प्रशासनाला स्थानिक म्हणून सांगणे आहे, असे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नितेश पाटील यांनी सांगितलं.