रायगड - गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने रायगड जिल्ह्यात दरडी कोसळून मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली होती. त्यानंतर राज्यसरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पोलादपूर तालुक्यातील मौजे केवनाळे येथील दरड कोसळून मृत 5 व्यक्ती, तसेच मौजे साखर सुतारवाडी येथील मृत 6 व्यक्तींच्या वारसांना आणि महाड शहर येथील महापुरातील पाण्यात बुडून मृत झालेल्या 3 व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून प्रत्येकी रु.4 लाख आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी रु.1 लाख असे प्रत्येकी एकूण रु.5 लाख सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
या अतिवृष्टीमध्ये तळीये हे गाव दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले गेले होते. या दुर्घटनेत एकून 29 जणांचा मृत्यू झाला. या 29 मृतांच्या वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून प्रत्येकी रु.4 लाख व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी रु.1 लाख असे प्रत्येकी एकूण रु.5 लाख सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तळीये दुर्घटनेतील जखमीपैकी 2 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, त्यांच्याही वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून प्रत्येकी रु.4 लाख सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच 05 मृत व्यक्तींच्या वारसांची निश्चिती करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे अनेकांच्या घऱात पाणी शिरले अनेकांचे संसार वाहून गेले, तर अनेकांची कपडे तसेच भांडी/ घरगुती वस्तू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी तातडीने मदत म्हणून शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे 5 कोटी 10 लक्ष 27 हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच बाधित कुटुंबांना संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांमार्फत सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.