रायगड - पंधरा दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर गुरुवार रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्यात बरसण्यास सुरुवात केली आहे. येत्या 72 तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे गणरायाचे आगमन आता पावसामध्येच होणार आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाने पंधरा दिवस चांगली उसंत घेतली होती. पावसाने उसंत घेतल्याने वातावरणात गर्मी निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना घामाच्या धारा सहन कराव्या लागत होत्या. मात्र, पुन्हा पावसाला सुरुवात केल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.
गुरूवार मध्यरात्री पासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागात पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात पावसाला सुरुवात झाली असल्याने गणरायाचे आगमानही पावसात होणार आहे. येत्या 72 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.