पनवेल - गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पनवेलमध्ये दमदार कमबॅक केले आहे. गेले काही पाऊस नसल्याने पनवेलकर उकाड्याने आणि पाणीटंचाईने त्रस्त झाला होता. मात्र, आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने पनवेलकर सुखावले आहेत.
पनवेलकरांना एक, दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी पाणी साठवून ठेवणे आणि काटकसरीने वापर करणे ही पनवेलकरांसाठी एक वेगळीच डोकेदुखी बनली होती. त्यातच पाऊस लांबल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सोसाट्याचा वारा आणि ढग जमू लागल्याने पनवेलमध्ये पावसाची शक्यता वाटू लागली.
पहाटे ५ नंतर एक मोठी सर येवून गेली. त्यानंतर सकाळी ९ च्या सुमारास ढगांच्या कडकडांटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची त्रेधा उडवली. इतकेच नाही तर शहरातील सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली. रस्त्यांवर साठलेल्या पाण्यामुळे वाहतुकही मंदावली होती.
दरम्यान, आज झालेल्या पावसामुळे वातावारणात थोडा गारवा निर्माण झाला आहे. नेमक्या सकाळच्या सत्रातील शाळा भरण्याच्या वेळेला पाऊस झाल्याने रेनकोट, छत्री न आणलेले विद्यार्थी भिजत जाताना दिसत होते. त्यामुळे परत आलेल्या पावसाने पनवेलकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.