रायगड - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे, 31 मेपासून 4 जूनपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागाने तटरक्षक दलाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व मच्छिमार संस्थांना पत्राद्वारे याबाबत कळवले आहे.
जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टी भागात मच्छिमार बांधव मासेमारी करीत असतात. मात्र, पुढील सहा दिवसात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे, वादळ होऊन किनारपट्टीला तसेच समुद्रात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब भारतीय तटरक्षक दलाच्या मुरुड कार्यालयाकडून अलिबाग सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागला कळवण्यात आली. त्यानुसार मत्स्य विभागाने 31 मेपासून 1 जूनदरम्यान मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आदेश दिले आहेत.