रायगड - इंडोस्पेस कंपनीसमोर शिरवली ग्रामपंचायतमधील पुष्पा ठोंबरे यांनी 22 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आपल्याला परिसरात असलेल्या कारखान्यामध्ये गावातील तरुणांना व्यवसाय मिळावा म्हणून धडपडत असताना गावनेत्यांमुळे कोणतेही काम मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राजकीय हस्तक्षेप
खालापूर तालुक्यात औद्योगीकरण वाढल्यामुळे येथील स्थानिक तरुणांना व्यवसायाची संधी मोठ्या प्रमाणात मिळणार म्हणून अनेक तरुण व्यवसाय करण्यासाठी तयारीत आहेत. मात्र राजकीय हस्तक्षेप आणि गावनेत्यांच्या वजनामुळे अन्य तरुणांना व्यवसाय मिळवताना शेवटचे टोक वापरायची वेळ सध्या शिरवली ग्रामपंचायतील तरुणांवर आली आहे. सुरू असलेला व्यवसाय गावनेत्यांमुळे बंद झाल्याने ठोंबरे या महिलेला उपोषणाचे हत्यार उचलावे लागले आहे.
वारंवार मागणी
पुष्पा ठोंबरे यांनी अनेक दिवस इंडो स्पेस कंपनीत स्थानिक तरुणांना व्यवसाय मिळावा, यासाठी कंपनीचे ठेकेदार राजे भाटिया यांच्याकडे वारंवार मागणी करीत होत्या. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पुष्पा ठोंबरे यांचा सुरू असलेला सुरक्षारक्षकाचा व्यवसायही काही नेत्यांच्या सांगण्यावरून बंद केला. येथील स्थानिकांसह स्वतःलाही न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषण त्यांनी सुरू केले आहे. तसेच आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.