रायगड - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. रायगडकरांच्या विविध प्रश्नाबाबत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय उपाययोजना करीत आहे. याची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच उच्चपदस्थ प्रशासकीय पदाधिकाऱ्यांनी आज (गुरुवारी) फेसबुक लाईव्हने जनतेशी संवाद साधला. फेसबुक लाईव्हला रायगडकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन आपल्या मनातील प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या. यावर प्रशासनानेही जनतेच्या शंकांचे योग्यरित्या निरसन केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रायगड जिल्ह्यातही झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा हे कोरोनाची लागण रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र असे असले तरी नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न कोरोनाच्या संचारबंदीने निर्माण झाले आहेत. यासाठी नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, राजीप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप हळदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.
कोरोनामुळे जिल्ह्यातील संचारबंदी कधी शिथिलबाबत, रेशनकार्ड धारकांचे प्रश्न, पावसाळ्यापूर्वी होणारी कामे, रखडलेली बांधकाम, परराज्यातील अडकलेली मजूर, जेएसडब्लू कंपनी, ग्रामपंचायत हद्दीत निर्जंतुकीकरण आणि नागरिकांची तपासणी, जिह्यात सुरू असलेल्या कंपनीबाबत, कोरोना तपासणीबाबत, पाणी टंचाई समस्येबाबत, पोलीस कारवाईबाबत, दारू, गुटखा, सोशल मिडियाबाबत अशी अनेक प्रश्न नागरिकांनी फेसबुक लाईव्हद्वारे प्रशासनाला विचारण्यात आली. जनतेच्या या प्रश्नांना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर उत्तरे दिली.
कोरोना विरुद्धच्या या लढाईत केंद्र आणि राज्य शासन तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि आवाहनाला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात कोरोनाची सद्यस्थितीही रायगडकरासमोर प्रशासनाने मांडली आहे. प्रशासनाला आतापर्यत जशी साथ दिलीत याबाबत जनतेचे आभार मानून पुढेही जनतेने अशीच साथ देण्याचे आवाहनही केले आहे.