रायगड - रेशनकार्ड नाही अशा मजूर, कामगार व्यक्तींनाही धान्याचा पुरवठा करण्याची योजना शासनस्तरावर सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्हा पुरवठा विभागाकडून अशा व्यक्तींना प्रत्येकी पाच किलो तांदूळ दिले जात आहेत. यासाठी रायगड जिल्हा पुरवठा विभागाने शासनाच्या निर्देशानुसार ‘इझीफॉर्म’ (ezeeforms) हे मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले असून, त्याद्वारे रेशन दुकानातून धान्य वितरित केले जात आहे. रायगड जिल्हा पुरवठा विभागाने बनविलेले हे मोबाईल अॅप राज्यातील 18 जिल्ह्यातही कार्यन्वित करण्यात आले आहे. त्यामुळे रायगड जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यासाठी बनविलेल्या अॅप्लिकेशनमूळे काम करणे सुकर झाले आहे.
कोरोनाच्या काळात कामधंदा बंद झाला असला तरी कोणीही उपाशी राहणार माही याची काळजी शासनाने घेतली आहे. रेशनकार्ड धारक याना जसे शासन स्वस्त आणि मोफत धान्य वितरित करीत आहेत. मात्र, कोरोना काळात ज्याच्याकडे रेशनकार्ड नाही अशा मजूर, कामगार नागरिकांची काळजीही शासनाने घेतली आहे. रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनाही रेशन दुकानातून प्रत्येकी पाच किलो तांदूळ देण्याची योजना लागू केली आहे. तसे निर्देश जिल्हास्तरावर शासनाने दिले होते.
रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना धान्य देण्याबाबत शिवभोजन अथवा नवीन अॅप्लिकेशन तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार रायगड जिल्हा पुरवठा विभागाने पहिले पाऊल उचलले असून, 'इझीफॉर्मस' हे मोबाईल अॅप्लिकेशन बनविले आहे. या अॅप्लिकेशनमध्ये लाभार्थी व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड व इतर माहिती भरून घेतली जात आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर त्वरित लाभार्थी व्यक्तीला धान्य दिले जात आहे. इझीफॉर्मस हे अॅप्लिकेशन तयार केल्यानंतर ते शासनाला दखवण्यात आले. त्याला शासनाने मंजुरी दिली असून, इतर जिल्ह्यातही हे अॅप्लिकेशन वापरण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
इझिफॉर्मस हे अॅप्लिकेशन जिल्ह्यातील सर्व रेशनदार दुकानदार यांना दिले आहे. जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार मजूर, कामगार व्यक्तींना याचा लाभ मिळणार असून 22 मे पासून या अॅपद्वारे 552 नागरिकांनी लाभ घेतला आहे. तर जिल्ह्यात रेशनकार्ड नसलेल्यासाठी 926 मॅट्रिक टन धान्य आलेले आहे. रायगड जिल्हा पुरवठा शाखेने बनविलेल्या या अॅप्लिकेशनमुळे रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना धान्य वितरित करणे सोपे झाले आहे. याचा फायदा राज्यातील 18 जिल्ह्यालाही भेटला असून त्यांनाही धान्य वितरित करणे सोपे झाले आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी दिली.