रायगड - भाई कोतवाल, हिराजी पाटील या हुताम्यांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. मात्र, आता त्यांचे वारसदार नाहीत. त्यामुळे आपणच त्यांचे वारसदार असल्याची भावना प्रत्येकाने मनात रुजवायला पाहिजे. त्यासाठी दरवर्षी सिद्धगडाच्या पवित्र भूमीवर दिवाळीत दीपोत्सव करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते.
कर्जत तालुक्यातील देशप्रेमाने भारावलेले तरुण दरवर्षी दिवाळी सण सिद्धगड येथे जाऊन परिसर दिव्यांनी उजळवून साजरा करतात. यावेळी उपस्थित तरुणांशी भरत भगत यांनी संवाद साधला व आदरांजली वाहिली.
हेही वाचा - मुंबईत भाजप विधिमंडळ नेता निवड बैठक; काय असणार उद्धव ठाकरेंची भूमिका?
2 जानेवारी 1943 रोजी आझाद दस्त्यातील क्रांतिकारकांवर ब्रिटिशांनी अमानूष गोळीबार केला. त्यात या स्वातंत्र्य संग्रामातील भाई कोतवाल व हिराजी पाटील यांना वीरमरण आले. भारतमातेच्या या दोन सुपुत्रांना हौतात्म्य प्राप्त झाले. देश स्वतंत्र झाला. मात्र, या क्रांतिकारकांची कायम आठवण राहावी यासाठी मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे 2 जानेवारी रोजी शासकीय आदरांजलीचा कार्यक्रम करण्यात येतो.
तरुणांना या हुतात्म्यांचे स्मरण कायम राहावे म्हणून ही घटना याची देही याची डोळा पाहणारे आझाद दस्त्यातील क्रांतिकारक भगत मास्तर यांचे सुपुत्र भरत भगत यांनी सिद्धगडावर दिवाळीत दीपोत्सवाचा निर्धार केला. गेली पाच वर्षे दिवाळीत सिद्धगडची पवित्र भूमी शेकडो दिव्यांनी उजळून निघते. सुरुवातीला 15 तरुणांना सोबत घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमात आता शेकडो तरुण सहभागी होत आहेत. केवळ कर्जत तालुक्यातूनच नव्हे तर मुरबाडमधील तरुण यात आपला सहभाग नोंदवत आहेत. दरवर्षी अनेक तरुण घरातील दिवाळी सण असताना देखील सिद्धगडावर दीपोत्सवाला येतात. यापुढे मी असेन नसेन पण ही सुरू झालेली परंपरा भावी पिढीने आत्मसात केली आहे. हेच माझ्यासाठी खूप आहे, असे दीपोत्सवावेळी बोलताना भगत यांनी सांगितले. बलिप्रतिपदेच्या पूर्वसंध्येला सिद्धगडावरील हुतात्मा स्तंभ व येथील माळ शेकडो दिव्यांनी उजळला होता. तसेच उपस्थित तरुणांनी यावेळी देशभक्तीपर गीते, पोवाडा गाऊन स्वातंत्र्य संग्रामातील घटनेला उजाळा दिला. अमर रहे अमर रहे, या देशभक्तीपर घोषणांनी सबंध आसमंत दुमदुमून गेला होता.