रायगड - मित्राच्या पत्नीबाबत अपशब्द वापरल्याबाबत दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात भांडण सोडवायला गेलेल्या तिसऱ्या मित्राला आपला जीव गमावण्याची वेळ आली. आरोपी याने भांडण सोडवायला गेलेल्या मित्राचा डाव्या कुशीत आणि पोटात चाकू भोकसून हत्या केल्याची घटना 23 डिसेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तळा तालुक्यातील बोरघर हवेली येथे घडली आहे. प्रकाश लक्ष्मण सावंत (25) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येबाबत गजानन शंकर कदम यास तळा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा तळा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
प्रकाश सावंतचा गेला हकनाक बळी
मृत प्रकाश सावंत आणि आरोपी गजानन कदम हे तक्रारदार सचिन सकपाळ याच्या घरात 23 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बसले होते. यावेळी आरोपी गजानन कदम याने तक्रारदार सचिन सकपाळ याच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले. याचा राग येऊन तक्रारदार सचिन सकपाळ आणि आरोपी गजानन कदम यांच्यात बाचाबाची झाली. भांडण विकोपाला जात असल्याचे बघून मृत प्रकाश सावंत हे भांडण सोडविण्यास मध्ये गेले. त्यावेळी आरोपी गजानन कदम याने आपल्या खिशात ठेवलेला चाकू काढून प्रकाश याच्या डाव्या कुशीत आणि पोटात खुपसला. या मारहाणीत प्रकाश हा गंभीर जखमी झाला.
आरोपी गजानन कदमला पोलिसानी केले अटक
प्रकाश याला तातडीने तळा येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हत्येची माहिती तळा पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी गजानन कदम याला पोलिसांनी अटक केले असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास तळा पोलीस निरीक्षक गेगजे करीत आहेत.