रायगड - मुरूड समुद्रकिनारी आज सकाळी मोठमोठ्या वस्तू लोकांना पाहायला मिळाल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण होते. तरीदेखील कुतूहलापोटी या वस्तू पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या वस्तू प्लास्टिक किंवा फायबरच्या आहेत. कंपनीच्या प्लांटमध्ये जसे बॉयलर पाहायला मिळतात, तशाच प्रकारच्या या वस्तू आहेत. एखाद्या बोटीवरुन पडून त्या वाहत आल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली असता, समोरच्या दिघी बंदरात येणाऱ्या बोटींना मार्ग निश्चित करून देण्यासाठी लावण्यात आलेले बोये आहेत. तसेच, सिग्नल यंत्रणा आहे. ते साखळीतून तुटून वहात किनाऱ्यावर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
रायगडात चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. समुद्रही खवळलेल्या परिस्थितीत आहे. त्यामुळे दिघी समुद्रात बोटींना दिशा दाखविण्यासाठी ठेवलेले दिशादर्शक सिग्नल व बोये समुद्राच्या खवळलेल्या पाण्याने साखळीतून निसटले आहेत.
हे निसटलेले बोये आणि दिशादर्शक वाहून मुरुड समुद्र किनाऱ्यावर वाहून आले आहेत. आधी हे काय वाहून आले याबाबत चर्चा रंगली होती. त्यामुळे मुरुडमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, आलेल्या वस्तू या बोये व दिशादर्शक असल्याचे कळल्यावर सर्वांनी निश्वास सोडला.